सातारा जिल्ह्यातील दैनिक प्रभातचा एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड यशवंत शिक्षण संस्था, सदाशिवगड यांना प्रदान.

कराड | प्रतिनिधी : दैनिक प्रभात तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रभात एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड २०२६’ या सोहळ्यात सदाशिवगड येथील यशवंत शिक्षण संस्थेचा,  शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान करण्यात आला. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार संस्थेचे सचिव ज्ञानेश्वर पाटील यांनी स्वीकारला.

दैनिक प्रभातचे पारितोषिक स्विकारताना सचिव श्री. ज्ञानेश्वर पाटील सर व पदाधिकारी.

यावेळी संस्थेचे पदाधिकारी,मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना संस्थेचे सचिव ज्ञानेश्वर पाटील यांनी दैनिक प्रभातचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच, “यशवंत शिक्षण संस्था भविष्यातही गुणवत्तापूर्ण शिक्षण देत विद्यार्थ्यांच्या ज्ञान, कौशल्य आणि सर्वांगीण विकासासाठी अधिक जोमाने कार्य करत राहील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या सोहळ्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. ज्ञानदेव मस्के, कुलगुरू, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून तेजस्विनी कदम, शिक्षण सभापती, जिल्हा परिषद सातारा, धनंजय चोपडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद सातारा आणि अनिस नायकवडी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद सातारा यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

यावेळी यशवंत शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीचा आणि विविध उपक्रमांचा आढावा घेणारी माहितीपट स्वरूपातील चित्रफीतही प्रदर्शित करण्यात आली. उपस्थितांनी या चित्रफितीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.

प्रभात एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड २०२६ हा सन्मान यशवंत शिक्षण संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्याची पोचपावती मानला जात असून, संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी तो निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

Janmat news
Author: Janmat news

मराठी न्यूज ब्रीफिंग

Read More