विजेचा शॉक लागून युवकाचा मृत्यू ; कराड तालुक्यातील खालकरवाडी येथील घटना ;अन्य तिघेजण जखमी.

विजेचा शॉक लागून युवकाचा मृत्यू ; तिघे जखमी. 

 

 

 खालकरवाडी, 30 जुलै : –  खालकरवाडी ता. कराड गावच्या हद्दीत विहिरी वर विद्युत कनेक्शन घेण्यासाठी वीज वाहक तारा ओढण्याचे काम सुरू असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने भीषण दुर्घटना घडली. या घटनेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य तिघेजण जखमी झाले आहेत. शनिवार दि. 29 रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान खांबावरुन तारा ओढत असताना वायरमनने अचानक प्रवाह सुरू केल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या घटनेसंदर्भात कोणतीही स्पष्टोक्ती केलेली नाही. दरम्यान युवकाच्या हाकनाक बळीला जबाबदार कोण असा सवाल व्यक्त होत आहे. ऋषीकेश प्रकाश कांबळे वय २७ राहणार केसे पाडळी ता.कराड असे शाॅक लागून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तर या घटनेत संजय रामचंद्र वीर वय 51, अमित महादेव कारंडे वय 30 दोन्ही राहणार केसे पाडळी ता. कराड, तन्मय रविंद्र अडकड वय २४ राहणार आडुळ ता. पाटण हे जखमी झाले असून त्यांच्यावर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान रविवारी रात्री उशिरापर्यंत उंब्रज पोलीस ठाण्यात या घटनेचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू होते. तर वायरमन, अधिकारी व कंत्राटदार यांच्यात कम्युनिकेशन नसल्याने ही दुर्घटना घडल्याची चर्चा चरेगाव परिसरात सुरू असून कामचुकार यंत्रणेवर कारवाईची मागणी केली जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी की उंब्रज येथील महावितरण कार्यालयाच्या अंतर्गत असणाऱ्या चरेगाव – खालकरवाडी गावच्या हद्दीत खाजगी कंत्राटदाव्दारे विद्युत पूल उभे करून त्यावरुन तारा ओढण्याचे काम सुरू होते. खालकरवाडी येथील डोंगर पायथ्याला शनिवारी सायंकाळी काम सुरू असताना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास येथे नेमणूक असलेल्या वायरमनने कामगार विद्युत पोलवरुन खाली उतरले की नाही याची खात्री न करताच या लाइनचा वीज प्रवाह सुरू केला. त्यामुळे खांबावरील वीजतारांमधून प्रवाह खिळाळू लागल्याने खांबावरील ऋषीकेश कांबळे या युवकाचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. तर तिघेजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान घटनास्थळी मदतकार्य उशीरा पोहचले. तसेच उंब्रज महावितरण कंपनीच्या वायरमनने केलेल्या हलगर्जीपणामुळे एका युवकास जीवितास मुखावे लागल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू होती. महावितरण व खासगी कंत्राटदाराच्या निष्काळजीपणा बाबत संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत. अनेकदा निष्काळजीपणामुळे शाॅक लागून जीवितास हानी होते. व काही ठराविक रक्कम देऊन नातेवाईकांच्या तोंडाला पाने पुसली जातात हे थांबणार कधी असा सवाल व्यक्त होत असुन या घटनेस जबाबदार असणाऱ्या निष्काळजी यंत्रणेवर कारवाईची मागणी केली जात आहे. खालकरवाडी गावच्या हद्दीत झालेली ही घटना निष्काळजीपणामुळे घडली आहे. वीज वाहक तारा ओढण्याचे काम सुरू असताना हद्दीतील महावितरणचे अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार यांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. मात्र असे न झाल्याने युवकाचा हाकनाक बळी गेला आहे. ऋषिकेश कांबळेच्या मृत्यूला जबाबदार कोण असा सवाल निर्माण झाला असून सध्यातरी यंत्रणा हातावर घडी तोंडावर बोट ठेवून आहे. तर उंब्रज पोलीस ठाण्यात शाॅक लागून मृत्यू झाल्याची घटना नोंद करण्यात आली आहे.. खालकरवाडीच्या डोंगरात देवळपेडा शिवारात विद्युत खांबावर इलेक्ट्रिक वायर ओढण्याचे काम सुरू असताना अचानक काम करणाऱ्या ऋषिकेश कांबळे याला जोराचा शॉक लागला यामध्ये तो गंभीररित्या भाजून जखमी झाला. यावेळी त्या ठिकाणी काम करणाऱ्या अन्य कर्मचा-यांनी गंभीर जखमी कांबळे तसेच जखमी असलेल्या तीन जणांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी ऋषिकेश कांबळे याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सदर घटनेची नोंद उंब्रज पोलीस ठाण्यात झाली असून तपास पोलीस नाईक व्हि. डी. डांगरे करत आहेत.

Janmat News
Author: Janmat News

Read More