कराडमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात; आमदार अतुलबाबा भोसले यांनी वाहिली आदरांजली.
कराड (प्रतिनिधी) / जनमत न्यूज :
साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कराड येथील बुधवार पेठ, महात्मा फुले नगर येथे विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास कराड दक्षिणचे आमदार मा. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी विशेष उपस्थिती लावून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी बोलताना आमदार अतुलबाबा भोसले म्हणाले की, “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या प्रगल्भ लेखणीतून, शाहिरीतून आणि विपुल साहित्यसंपदेतून शोषित, वंचित, कष्टकरी आणि सामान्य जनतेच्या संघर्षाला आणि व्यथांना वाचा फोडली. त्यांनी दिलेला सामाजिक समता, न्याय आणि स्वाभिमानाचा संदेश हा आजही समाजाला मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे.”
कार्यक्रमा दरम्यान उपस्थित सर्व मान्यवरांनी व नागरिकांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याचा, तसेच सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ करण्याचा ठाम संकल्प केला.
या कार्यक्रमाला स्थानिक नगरसेवक, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बुधवार पेठ व महात्मा फुले नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडले.
Author: Janmat news
मराठी न्यूज ब्रीफिंग





