कराड ( प्रतिनिधी ) : कराड शहरात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने (DB) एक अत्यंत मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी बेकायदेशीररीत्या बाळगलेली ४ देशी बनावटीची पिस्तुले (गावठी कट्टे) आणि ८ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी चौघा जणांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी झाली कारवाई
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने शहरात सापळा रचून ही धडक कारवाई केली. संशयितांची झडती घेतली असता त्यांच्याकडे बेकायदेशीररीत्या बाळगलेली शस्त्रे आढळून आली. पोलिसांनी तात्काळ ४ देशी बनावटीची पिस्तुले आणि ८ जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त केला असून, शस्त्रांसह चौघा आरोपींना ताब्यात घेतले आहे.
पोलीस करत आहेत अधिक तपास.
या कारवाईनंतर पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. हे तरुण एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवैध शस्त्रे कोणत्या उद्देशाने बाळगून होते? हा शस्त्रांचा साठा त्यांनी कोठून आणला होता? आणि शहरात कोणत्या मोठ्या गुन्ह्याचा कट रचला जात होता का? या सर्व बाजूंचा पोलीस कसून तपास करत आहेत.
गुन्हेगारीवर वचक बसणार:
कराड पोलिसांच्या या दमदार कामगिरीमुळे शहरातील गुन्हेगारी विश्वाला मोठा हादरा बसला असून, बेकायदेशीर कारवाया करणाऱ्यांवर मोठा आळा बसेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांच्या या तत्परतेमुळे नागरिकांमधूनही समाधान व्यक्त होत आहे.
वृत्त संकलन: राहुल वाघमारे, जनमत न्यूज टाइम्स, कराड.
Author: Janmat news
मराठी न्यूज ब्रीफिंग





