जनसंपर्काच्या जोरावर विरोधकांचे विजयाचे स्वप्न भंगले ; म्हावशी गटात विजयाची ‘हॅट्ट्रिक’
चाफळ (प्रतिनिधी) :- राजकारणात आरोपांच्या फैरी झाडणे सोपे असते, पण त्या आरोपांना संयमाने आणि थेट विजयाने उत्तर देणे हीच खऱ्या नेतृवाची ओळख असते. हेच पुन्हा एकदा सिद्ध केले आहे चाफळ भागाचे खंबीर नेतृत्व मा. श्री. राजेश पवार यांनी. म्हावशी जिल्हा परिषद गटातून मा.सत्यजित पाटणकर यांचा विश्वास सार्थ ठरवत. सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत त्यांनी केवळ विजयाची ‘हॅट्ट्रिक’च साधली नाही, तर विरोधकांच्या सर्व राजकीय आरोपांना आपल्या विकासकामांच्या जोरावर चोख प्रत्युत्तर दिले आहे.
आरोपांचा धुरळा उडाला, पण विकासाचा ‘पवार’ सुटला!
निवडणुकीच्या काळात राजेश पवार यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. मात्र, डगमगून न जाता ‘कामातून उत्तर देणारा नेता’ अशी ओळख असलेल्या पवार यांनी शांतपणे आपली रणनीती आखली. चाफळ भागातील जनतेशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे नाते आणि गेल्या दोन टर्ममध्ये केलेली क्रीडा, शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील कामे हीच त्यांची ढाल बनली.

आरोपांचे राजकारण विरुद्ध विकासाचा अजेंडा.
यावेळची निवडणूक राजेश पवार यांच्यासाठी केवळ एक लढत नव्हती, तर त्यांच्या मागील १० वर्षांच्या कामाची पावती होती. निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांनी त्यांच्यावर अनेक राजकीय आरोप केले, टीकेची झोड उठवली. मात्र, “टीकेला उत्तर शब्दांनी नाही, तर कामाने द्यायचे,” हा मंत्र जपत पवार यांनी प्रत्येक खेड्यापाड्यात, वाडीवस्तीवर आपला संपर्क कायम ठेवला.
म्हावशी गटात आणि चाफळ भागात त्यांनी राबवलेली नेत्र तपासणी मोहीम, दुर्गम भागातील शाळांचा सुधारलेला शैक्षणिक दर्जा आणि तरुणांसाठी उपलब्ध करून दिलेली क्रीडा संकुले या गोष्टी मतदारांच्या मनात घर करून होत्या. त्याचाच परिणाम म्हणून मतपेटीतून विरोधकांच्या आरोपांना जनतेने नाकारले आणि राजेश पवारांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले.
दोन मित्रांमधील अटीतटीची झुंज
ही निवडणूक एका विशेष कारणाने चर्चेत होती, ती म्हणजे एकेकाळचे दोन शाळासोबती आणि मित्र आमनेसामने असणे. शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार भरत साळुंखे यांनी पवार यांना कडवे आव्हान दिले होते. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत ३८१ मतांच्या निसटत्या पण अत्यंत महत्त्वाच्या फरकाने राजेश पवार यांनी बाजी मारली. चाफळ गणात शिवसेनेच्या राधिका पाटील यांनी मुसंडी मारली असली, तरी एकूण गटाचे नेतृत्व करण्यात राजेश पवार यशस्वी ठरले आहेत.
“लोकांनी माझ्यावर टीका केली, मी त्यांच्यासाठी कामे केली. आजचा हा विजय माझा नसून, माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याचा आणि मतदाराचा आहे.”
— राजेश पवार

विजयाची प्रमुख वैशिष्ट्ये:
शांतीत क्रांती: कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचून मताधिक्य मिळवले.
हॅट्ट्रिकचा मान: म्हावशी गटात सलग तीनवेळा निवडून येण्याचा दुर्मिळ बहुमान पटकावला.
विरोधकांना धोबीपछाड: अटीतटीच्या लढतीत आपल्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव करत चाफळ आणि म्हावशी परिसरातील आपले वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित केले.
कार्यकर्त्यांचा जल्लोष.
विजयाची अधिकृत घोषणा होताच चाफळ परिसरात गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. “कोण आला रे कोण आला, चाफळचा वाघ आला,” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. राजेश पवार यांना खांद्यावर उचलून घेत कार्यकर्त्यांनी हा विजयोत्सव साजरा केला.
येणाऱ्या काळात ‘किंगमेकर’ म्हणून राजेश पवार यांची भूमिका पाटण तालुक्याच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, हे या निकालाने स्पष्ट झाले आहे.
Author: Janmat news
मराठी न्यूज ब्रीफिंग






