Janmat News

सत्यजित पाटणकर भाजपमध्ये प्रवेश करणार; तालुक्यात होणार राजकीय बदल.

सातारा : राष्ट्रवादीच्या स्थापनेवेळी सर्वप्रथम शरद पवारांसोबत गेलेले पाटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर आणि त्यांचे सुपूत्र सत्यजितसिंह पाटणकर या महिनाअखेरीस भाजपावासी होणार आहेत. निकटवर्तीयांचा हा प्रवेश शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. या प्रवेशामुळं पाटण तालुक्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू होणार आहे.

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांशी एकनिष्ठ : काँग्रेसमधून बाहेर पडून शरद पवारांनी १९९९ ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी सातारा जिल्ह्यातून सर्वप्रथम विक्रमसिंह पाटणकर हे पवारांबरोबर गेले होते. त्याही आधीपासून ते शरद पवारांचे विश्वासू होते. १९९९ साली सत्तेवर आलेल्या विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीतून विक्रमसिंह पाटणकरांना सार्वजनिक बांधकाम खात्याचं कॅबिनेट मंत्रिपद मिळालं होतं. राजकीय चढ उतारात पाटणकर घराणं कायम पवारांच्या पाठीशी राहिलं.

पाटण तालुक्याचे पाच टर्म आमदार : विक्रमसिंह पाटणकर यांची १९८३ पासून राजकीय कारकीर्द सुरू झाली. पाच टर्म त्यांनी पाटण तालुक्याचं विधिमंडळात नेतृत्वं केलं. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार शंभूराज देसाईंकडून त्यांचा पराभव झाला. मात्र, २००९ च्या निवडणुकीत ते पुन्हा विजयी झाले. २०१४ नंतर ते राजकारणातून बाजूला झाले. मात्र, समाजकारणात आजही ते कार्यरत आहेत.

पाटणकरांच्या दुसऱ्या पिढीकडे नेतृत्व : विक्रमसिंह पाटणकरांनी विधानसभा निवडणुक न लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी आपले पूत्र सत्यजितसिंहांना पाटणमधून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. मात्र, तीन टर्म त्यांना यश मिळवता आलं नाही. शिवसेनेच्या शंभूराज देसाईंनी त्यांचा पराभव केला. त्यातच सत्तेची ताकद नसल्यानं कार्यकर्त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होऊ लागला. विकासकामांसाठी सरकारची ताकद पाठीशी लागते, म्हणून कार्यकर्त्यांनी भाजपात जाण्याचा आग्रह धरला. त्यातूनच भाजपामध्ये जाण्याचा निर्णय त्यांना घ्यावा लागला.

 

भाजपाच्या जिल्हा कार्यकारिणीकडून स्वागत : विक्रमसिंह पाटणकर हे राजघराण्यातील आहेत. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेत पाटणकर घराण्याचं योगदान होतं. त्यामुळे त्यांना ‘पाटणकर सरकार’ म्हटलं जातं. अशा मातब्बर घराण्याच्या प्रवेशाचं भाजपाच्या जिल्हा कार्यकारिणीकडून स्वागत होतंय. त्यांच्या पक्ष प्रवेशाला भाजपातील कुणीही विरोध केलेला नाही. तसंच शंभूराज देसाई हे विरोधक सोडले तर त्यांचं इतरांशी राजकीय शत्रुत्व नाही. ही बाब देखील त्यांच्यासाठी जमेची ठरली आहे.

 

पक्ष कार्यालयात होणार प्रवेश : मातब्बर नेत्यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करण्याचं नियोजन सुरू होतं. मात्र, आधी पक्ष प्रवेश करून नंतर राजकीय मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळं भाजपाच्या पक्ष कार्यालयात पाटणकर गटाचा प्रवेश होणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (२६ मे) पाटण मतदार संघातील कार्यकर्त्यांची बैठक पाटणमध्ये आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर सत्यजितसिंह पाटणकर हे पाटण विधानसभा मतदार संघात दौरा करणार असून भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत भव्य मेळावा घेतला जाणार असल्याची माहिती दिली.

Janmat News
Author: Janmat News