बंगळुरू :- भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील ३ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना इंदूरच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने शानदार खेळ करत ६ गडी राखून विजय मिळवला आहे.
यासह टी -२० मालिकेत २-० ची विजयी आघाडी घेतली आहे. टी -२० वर्ल्डकप २०२२ स्पर्धेनंतर टी -२० संघात कमबॅक करत असलेल्या रोहित शर्माला या सामन्यातही खातं उघडता आलेलं नाही. दरम्यान मैदानात उतरताच त्याच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
असा कारनामा करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज..
रोहित शर्माने टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहासाला गवसणी घातली आहे. तो १५० टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. आयर्लंडचा फलंदाज पॉल स्टर्लिंग या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. त्याने १२८ टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तर १२४ सामने खेळणारा शोएब मलिक या यादीत तिसऱ्या स्थानी आहे.
न्यूझीलंड संघाचा आक्रमक फलंदाज मार्टिन गप्टीलच्या नावे १२२ टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची नोंद आहे. या दिग्गज खेळाडूंसह बांगलादेशचा महमदुल्लाह रियाज, न्यूझीलंडचा टीम साउदी आणि भारतीय संघाचा विराट कोहली या खेळाडूंचा समावेश आहे. विराट कोहलीने भारतीय संघाकडून ११६ टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
Author: Janmat News





