कराड ( प्रतिनिधी ) :- कराड हे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्याचबरोबर पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची ठिकाणे कराड परिसरात उपलब्ध आहेत. या परिसरातील पर्यटन वाढीसाठी कराड विमानतळचे विस्तारीकरण आणि विकास करणे आवश्यक आहे. त्या कामांसाठी सुधारीत प्रशासकीय वित्तीय मान्यतेअंतर्गत २२१ कोटी ५१ लाखांच्या खर्चास सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, असा अद्यादेश राज्य शासनाच्या अव्वर सचिव राजश्री हिर्लेकर यांनी जारी केला आहे. त्यामुळे कराडच्या विमानतळ विस्तारवाढीसह विकासाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. कराड विमानतळाचे विस्तारीकरण व्हावे यासाठी आमदार पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना येथील विमानतळाचे विस्तारीकरण आणि विकास कामांसाठी शासनाने २८ ऑगस्ट २०१२ अन्वये प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यावेळी ९५ कोटी ६४ लाखांच्या खर्चास वित्तीय मान्यता दिली होती. त्यानंतर श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या परिसरातील शेतकऱ्यांनी विस्तारवाढीला विरोध केला होता. त्यामध्ये मधला ११ वर्षांचा काळ गेला. दरम्यान पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची ठिकाणे कऱ्हाड परिसरात उपलब्ध आहेत. या परिसरातील पर्यटन वाढीसाठी कराड विमानतळचे विस्तारीकरण आणि विकास करणे आवश्यक आहे. त्या कामांसाठी सुधारीत प्रशासकीय वित्तीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यासाठी २२१ कोटी ५१ लाखांच्या खर्चाचा सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने शासनाकडे सादर केला होता.
निधीसाठी पृथ्वीराज चव्हाणांचा पाठपुरावा
पावसाळी अधिवेशनात आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विमानतळ विस्तारीकरणांचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता. त्यांनी महाराष्ट्रातील तालुका ठिकाणचं पहिलं विमानतळ कराडला जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी सुरू केले. कराड हे पश्चिम महाराष्ट्रातील मध्यवर्ती ठिकाण आहे. विमानतळ विस्तारिकरणासाठी ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांना योग्य मोबदला देण्याची आवश्यकता असल्याची मागणी केली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळ विस्तारीकरणाबाबत जर शेतकऱ्यांच्या काही अडचणी नसतील तर निधीची कोणतीही कमी होणार नाही. कराडचे विमानतळ हे अत्यंत महत्त्वाचं व स्ट्रेटेजिक विमानतळ आहे. त्यामुळे जर त्याचा विस्तार करता आला तर त्याचा नक्कीच त्या भागातील लोकांना फायदा होऊ शकतो असे सांगीतले होते. त्यानुसार संबंधित निधी मंजुर झाल्याचे आमदार चव्हाण यांच्या कार्यालयाकडुन कळवण्यात आले आहे.
Author: Janmat News





