Chandrayaan-3 : – एका महत्त्वाच्या प्रक्रियेत हे यान चंद्राच्या कक्षेत पोहचवले जाईल. म्हणजेच चांद्रयान-3 चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत पोहोचेल. चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत पोहोचण्याची प्रक्रिया यशस्वी होईल, अशी शास्त्रज्ञांना आशा आहे.
श्रीहरिकोटा ५ जुलै :- अंतराळ संशोधन संस्था, इस्रोनं 14 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून नियोजित वेळेनुसार चांद्रयान 3 चं यशस्वी प्रक्षेपण केलं होतं. तेव्हापासून आत्तापर्यंत चांद्रयानानं सुरळीत प्रवास केला आहे. चंद्राच्या दिशेनं वेगानं जाणारं चांद्रयान-3 चंद्राच्या सीमेवर पोहोचण्यासाठी सज्ज झालं आहे. यानानं पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील दोन तृतीयांश पेक्षा जास्त अंतर कापलं असून आज (5 ऑगस्ट) यान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार आहे.
इस्रोनं शुक्रवारी सांगितलं की, चांद्रयान-3 नं प्रक्षेपण केल्यापासून पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील जवळपास दोन तृतीयांश अंतर पार केलं आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून इस्रोचं हे यान पृथ्वीपासून दूर अंतराळात जात आहे. 1 ऑगस्ट रोजी यानानं क्रिटिकल ट्रान्स-लुनार इंजेक्शन (टीएलआय) पूर्ण केलेलं आहे, याबद्दलचं वृत्त’अमर उजाला’नं प्रसिद्ध केलं आहे.इस्रोच्या बंगळुरू स्थित मुख्यालयानं शुक्रवारी सांगितलं की, ट्रान्स-लुनार इंजेक्शननंतर, चांद्रयान -3 पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडलं असून चंद्राच्या दिशेनं जाऊ लागलं आहे. शनिवारी आणखी एका महत्त्वाच्या प्रक्रियेत हे यान चंद्राच्या कक्षेत पोहचवलं जाईल. म्हणजेच चांद्रयान-3 चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत पोहोचेल. चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत पोहोचण्याची प्रक्रिया यशस्वी होईल, अशी शास्त्रज्ञांना आशा आहे.इस्रोनं दिलेल्या माहितीनुसार, 5 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजता लुनार ऑर्बिट इंजेक्शन (LOI) केलं जाईल. चांद्रयान-3 चंद्राच्या सर्वात जवळ असेल तेव्हा ही प्रक्रिया सुरू केली जाईल.
चांद्रयान-3 सध्या ताशी 37 हजार 200 किलोमीटर वेगानं चंद्राकडे जात आहे. चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर ते त्याच्या पृष्ठभागापासून सुमारे 40 हजार किलोमीटर दूर राहील. अंतराळ संस्थेनं यापूर्वी सांगितले आहे कीस भारताच्या तिसऱ्या चंद्र मोहिमेची स्थिती पूर्णपणे सामान्य आहे. 23 ऑगस्ट रोजी यान चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करेल.
टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, अपेक्षेप्रमाणे यान चंद्राच्या प्रारंभिक कक्षेत पोहोचल्यानंतर ते इच्छित 100 किमीच्या वर्तुळाकार कक्षेत खाली आणण्यासाठी इस्रोला अनेक मेन्युव्हर्स करावे लागतील. इस्रोनं अद्याप याबाबत अधिकृतपणे भाष्य केलं नसलं तरी, चांद्रयान-3 गोलाकार कक्षेपर्यंत पोहोचण्यासाठी अंतराळ संस्था किमान चार मून-बाउंड मेन्युव्हर्स करेल, असा अंदाज आहे. जर सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडली तर 23 ऑगस्ट रोजी यानातील लँडर चंद्रावर उतरेल. लँडिंगनंतर रोव्हर लँडरपासून वेगळं होईल आणि डेटा गोळा करण्यासाठी चंद्राच्या पृष्ठभागावर फिरेल.






