धाराशिव :- महाराष्ट्रात काका पुतण्यामध्ये अंतर पडल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. यानंतर आता पक्षातही एका काका-पुतण्यात दोन गट पडल्याचे पाहायला मिळाले आहे. राज्याच्या राजकारणात काका-पुतण्याची लढाई जोरदारपणे सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसोबत बंडखोरी केल्याने पक्षात उभी फूट पडली आहे. यानंतर पक्षातील आमदार-खासदारांसह कार्यकर्तेही दोन गटात विभागले आहेत. याच गटबाजीत आता आणखी एक काका-पुतणे वेगळे झाले आहेत. धाराशिव जिल्ह्यात पुतण्याने काकाची साथ सोडल्याचे पाहायला मिळत आहे. भूम परंडा वाशीचे 3 टर्म आमदार राहिलेले माजी आमदार राहुल मोटे हे राष्ट्रवादी पक्षात अजित पवाराच्या खूप जवळचे मानले जायचे. त्यांचा बाणगंगा कारखानादेखील अजित पवार यांनी भाडेतत्वावर चालवण्यासाठी घेतला आहे, असे असताना अजित पवारांनी बंड केल्यानंतर माजी आमदार राहुल मोटे यांनी अजित पवारांची साथ सोडत शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्धार केला आहे.
माजी आमदार राहुल मोटे यांनी आज धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून त्यांनी शरद पवार हे आमचे नेते आहेत. त्यांच्या माध्यमातूनच विकास होऊ शकतो, असे सांगत त्यांच्यासोबत राहण्याचा निर्धार व्यक्त केला असून जे संभ्रम अवस्थेत आहेत तेही आमच्या सोबत येतील असा विश्वास राहुल मोठे यांनी व्यक्त केला आहे. तर आपण अजित पवार यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडणार असल्याचेदेखील राहुल मोठे यांनी माध्यमांना सांगितलं आहे. एकूणच राहुल मोठे यांच्या या भूमिकेने धाराशिव जिल्ह्यातील राजकारणात खळबळ माजली आहे. राहुल मोठे हे अजित पवारांना साथ देतील असा अंदाज बांधला जात असतानाच त्यांनी शरद पवारांसोबत जात असल्याचे जाहीर केल्याने त्यांनी आपल्या काकाला सोडून दिल्याने अजित पवार यांच्यासाठी हा धक्का आहे.

Author: Rahul Waghmare





